शिंगणापूर : शनिदेवाच्या शिळेची झीज रोखण्यासाठी शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एक मार्चपासून शनिशिंगणापुरातील चौथऱ्यावर तैलाभिषेक करताना केवळ ब्रँडेड, शुद्ध रिफायनरी खाद्यतेलाचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. तेलातील भेसळीमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. देवस्थानकडून हा निर्णय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत व ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आहे.
शिंगणापुरात शनिदेवाच्या मूर्तीवर तैलाभिषेक करण्याची अनादी परंपरा आहे. मात्र, अनेक भाविकांकडून भेसळीचे व रासायनिक मिश्रण असलेले तेल अर्पण केले जात असल्याची तक्रार होती. त्यामुळे मूर्तीची झीज होत आहे. या समस्येवर उपाय म्हणून आता प्रमाणित खाद्यतेलच वापरण्याचे ठरवले आहे. देवस्थानने स्पष्ट केले आहे की, भाविकांनी आणलेल्या तेलाबाबत शंका वाटल्यास ते तेल स्वीकारले जाणार नाही. तसेच संशयित तेल भारतीय अन्नसुरक्षा प्राधिकरणाकडे तपासणीसाठी पाठवले जाईल.
अप्रमाणित तेलात पॅराथिनचे अंश असल्याचे निदर्शनास आले आहे. अहिल्यानगरचे अन्न व औषध प्रशासन अधिकारी राजेश बडे यांनी सांगितले की, प्रमाणित खाद्यतेलात केमिकल नसते, त्यामुळे त्याचा वापर सुरक्षित असतो. मात्र, अप्रमाणित तेलात पॅराथिनसारखे हानिकारक रसायन आढळते. त्यामुळे तेलाचा विपरीत परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर देवस्थानने भेसळीच्या तेलाला प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेतला आहे.
शिंगणापुरात भेसळीच्या तेलाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या. काही ठिकाणी तेलाच्या पॅकिंगवरील वजन व प्रत्यक्ष वजनात फरक असल्याचे आढळले होते. त्यामुळे या गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी देवस्थानने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भाविकांची आर्थिक फसवणूक थांबेल, तसेच देवस्थानची होणारी फसवणूक टळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
मंदिर परिसरात खाद्यतेल विक्री करताना संबंधित कंपनीचा लायसन्स क्रमांक पॅकिंगवर असणे आवश्यक आहे. तसेच, केवळ मान्यताप्राप्त खाद्यतेलच शनिदेवाच्या मूर्तीवर अर्पण करता येणार आहे. भाविकांनी या निर्णयाचे स्वागत करत सुरक्षित व शुद्ध तैलाभिषेकासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)